शिर्डीतील साईबाबांचे मंदिर खुले करा अन्यथा…भाजप खासदाराचा सरकारला इशारा

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : राज्यातील मंदिरे खुली करा अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांचे मंदिर खुले करा, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. मंदिर खुले करा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा,सुजय विखे यांनी दिला आहे. सोबतच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मंदिरे खुले करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे.

टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ झाला तरी राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.त्यामुळे राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करा,अशी मागणी  विखे पिता-पूत्रांनी केली आहे. प्रवरा कारखाना येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक गणरायाची विधीवत प्राण प्रतिष्ठापना केली.यावेळी उपस्थित सुजय विखे यांनी मंदिरांसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील वैष्णोदेवी, तिरुपती मंदिरे खुली करण्यात आली आहेत. शिर्डीतील संस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. शिर्डीचे सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन देणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले. तसेच यावर लवकर निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मंदिरे खुली करण्या संदर्भातील मागणी करत काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर येथील पुजा-यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मंदिरे खुली झाली पाहिजे यावर राज ठाकरेंनी देखील सकारात्मकता दर्शवली होती. योग्य ती काळजी घेऊन मंदिरे खुली झाली पाहिजेत, असे मत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केले होते. मिशन बिगिन अंतर्गत राज्यात मॉल जिम आता सुरू करण्यात आले आहेत. परंतु धार्मिक स्थळांबाबत अद्याप निर्णय न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Previous articleआता लिपिक गट “क” पद झाले,महसूल सहायक
Next articleगणराया…जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर!