गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे ९ फोन

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त विधानामुळे सुरू झालेला वाद अद्यापही कायम आहे. या वादावरूनच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना चक्क धमकीचे फोन आले असल्याची माहिती मिळाली आहे.गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून तब्बल ९ धमकीचे फोन आले आहेत.  कंगनापासून दूर राहा,अशी धमकी या फोनमधून देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.या धमकीच्या फोन कॉलनंतर मुंबई पोलिसांनी त्याचा तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी देणाऱ्या व्यक्तींनी कंगनापासून दूर राहण्यास सांगितले.तसेच तिच्या विरोधातील कारवाई थांबवण्याचा इशारा दिला असून आम्ही सांगतो ते लक्षात घ्या आणि सुधारा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत गृहमंत्र्यांना ७ धमकीचे फोन येऊन गेले.तर आज बुधावरी ९ सप्टेंबरला देखील त्यांना २ धमकीचे फोन येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.

कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही धमकीचा आरोप केला होता. मात्र आता कंगनाच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर या प्रकरणी आपण चौकशी करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यानंतर कंगाने आपण ड्रग्सच्या चौकशीसाठी तयार असल्याचे म्हणत गृहमंत्र्यांना आव्हान दिले होते. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांना आलेले धमकीचे फोन चिंता वाढवणारे आहेत.

Previous articleशेतकऱ्यांसाठी ५००० कोटींचे पॅकेज जाहीर करा; प्रवीण दरेकर यांची मागणी
Next articleअंतिम वर्षाच्या परीक्षा “या” तारेखपासून होणार, पॅटर्न जाहीर