गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणे राजकीय पक्षांना ठरणार डोकेदुखी

मुंबई नगरी टीम

मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निवडणूकीत उमेदवारी देणे आता राजकीय पक्षांना चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात सुधारीत सूचना जारी केल्या असून,अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारा किंवा अशा व्यक्तीला ज्या राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.त्यांना संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तीन वेळा प्रसिद्ध करावा लागणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा करण्यात आली.संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूकीय लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी,उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्यां सुधारीत सूचनांनुसार उमेदवारांनी,तसेच त्यांना उमेदवारी दिलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या ४ दिवसांमध्ये अशा व्यक्तीची माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांमध्ये दुस-यांदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध करावी लागणार आहे.तर मतदान होण्याच्या दोन दिवस अगोदर तिस-यांदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.बिनविरोध विजयी होणा-या उमेदवारास तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय यांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिद्ध करावा लागणार आहे.

यासंदर्भातील सर्व सूचना,गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांना पाळाव्या लागणार आहेत.या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होतील.असे राज्य  निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Previous articleमंत्री जयंत पाटील यांच्यामुळे १५ महिन्याच्या ऋतूराजला मिळाले जीवनदान
Next articleचीनच्या राजकीय-आर्थिक कोंडीचे धाडस मोदी सरकार कधी दाखवणार ?