राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा : प्रवीण दरेकरांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

महाड : पेण तालुक्यात घडलेल्या अमानवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून माणूसकीला काळीमा फासणारी ही घृणास्पद घटना आहे.नराधमांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे या विकृत मनोवृत्तीच्या नराधमांचे मनोबल वाढत चालले आहे. या नराधमांना पोलिसांचा धाक राहिला नाही,राज्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत अशी टीका करतानाच,हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

पेण येथील एका निष्पाप तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या केल्याची घटना घडल्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज तातडीने पेण तालुक्याला भेट दिली. त्या दुदैुर्वी कुटुंबियांची घरी जाऊन दरेकर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या संतापजनक घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी अलिबागचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांची पेण पोलिस ठाण्यात भेट घेतली. यावेळी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दरेकर म्हणाले की, तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणारी विकृत मानसिकता हद्दपार व्हायला हवी. पोलीसांचा धाक-दरारा कमी झाला असून अशा घटना करण्याचे धाडस होत आहे. या घटनेत आदिवासी कुटुंबातील चिमुरडीचा जीव हकनाक गेला. फास्टट्रॅक कोर्ट, फाशीची शिक्षा सर्व होईल, पण त्या निष्पाप चिमुरडीचा जीव पुन्हा कसा येणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ही घटना अतिशय संतापजनक व मनाला चीड आणणारी आहे. या नराधमाने याआधी दोन गुन्हे केले असून याआधीही पॉक्सोच्या प्रकरणी तो जेलमध्ये होता. आरोपी जामिनावर बाहेर आला असताना पोलिसांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक होते. आज जर या नराधमाला कठोर शिक्षा झाली नाही. तर असे अनेक विकृत मनोवृत्तीचे नराधम मोकाट सुटतील. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. पुणे, रोहा मध्ये सुध्दा अश्या घटना घडल्या होत्या. राज्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गृहमंत्र्याची भेट घेऊन लवकरात लवकर याप्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी आपण मागणी करणार आहे, तसेच या प्रकरणाचा निकाल तातडीने लागावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची व त्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

दरेकर यांनी सांगितले की, या अधिवेशनात शक्ती कायदा विषयी चर्चा करण्य़ात येणार होती. पण ती झाली नाही. राज्यात महिला व बालिकांवर होणारे अत्याचार रोखण्यास व सध्याच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकार कमी पडत आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजे. त्यादृष्टीने विशेष अभियान राबिवण्याची आवश्यकता आहे. हे सरकार आता कधी जागे होणार, अश्या किती दुदैर्वी घटना घडण्याची वाट सरकार पाहणार असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला.

Previous articleआता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार
Next articleबेरोजगारांना दिलासा :आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करणार