दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय : शरद पवार

मुंबई नगरी टीम

अकोले : पक्ष अडचणीत असताना गेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.यामध्ये शरद पवार यांच्या जवळचे अनेक सहकारी होती.अशा पक्ष सोडणा-यांचा खरपूस समाचार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.पवार हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर होते.त्यावेळी त्यांनी मधुकर पिचड यांना चांगलाच टोला लगावला.

गेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजप मध्ये प्रवेश केला.या मध्ये अहमदनगर मधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांचाही समावेश होता.पिचड यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला त्यावेळी मोठा हादरा बसला होता.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौ-यावर होते.त्यावेळी ते आपल्या भाषणातून पिचड यांच्या कोणत्या भाषेत समाचार घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.पवार यांनी आजच्या भाषणात पिचड यांच्यावर निशाणा साधला.“राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही.विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी मी अकोल्यात सभा घेतली, त्याचवेळी जनतेच्या मनातल कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं,ते झालं आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी पिचड यांचा समाचार घेतला.

माजी आमदार स्व. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.आपल्या भाषणात त्यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि सध्या भाजपात असलेल्या मधुकर पिचड यांना पवारांनी नाव न घेता लक्ष्य केले.अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं,” असा टोला पवार यांनी पिचड यांचे नाव न घेता लगावला.येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली.कारखान्यावर २०० कोटींच‌े कर्ज आहे. जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा. त्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो, अशा शब्दात पवार यांनी पिचड यांच्यावर निशाणा साधला.

Previous articleहिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण
Next articleआम्हीही याच देशातील आहोत,ओबीसींची जनगणना करा : पंकजा मुंडेंची मागणी