जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना दे धक्का;भाजपचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीचा महापौर

मुंबई नगरी टीम

  • राष्ट्रवादी,कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार सांगलीच्या महापौरपदी
  •  भाजपला सत्ता टिकवण्यास अपयश
  • भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल

सांगली । सांगली-मिरज-कुपवाड मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.या मनपावर भाजचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’, आज त्याचाच प्रत्यय आला असून सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसला आहे.सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.

Previous articleकोरोनाचे नियम पायदळी तुटवणा-या संजय राठोड यांच्या समर्थकांवर कारवाईचे आदेश
Next articleखा.मोहन डेलकरांच्या सुसाईड नोट मध्ये भाजपच्या बड्या नेत्याचे नाव : काँग्रेसचा गौप्सस्फोट