दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या;दहावीची जून मध्ये तर बारावीची परीक्षा मे मध्ये होणार

मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.येत्या २९ एप्रिलपासून सुरू होणारी दहावीची परीक्षा आता जून महिन्यात तर २१ एप्रिलपासून सुरू होणारी बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार बारावीची २१ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होती.राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधीत झाल्याने या परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न शिक्षण विभागापुढे होता.राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी याबाबत चर्चा केली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत दहावी आणि बारावीच्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.त्यानुसार आता दहावीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल तर बारावीची परीक्षा या मे महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये या गोष्टीवर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.इतर बोर्डाच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता असल्याने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी,पालक यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी,टीसाएस,गुगल इंडिया आदींसोबत उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यांची माहितीही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केली होती.दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, परिक्षेसाठी लागणारा इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक घटक यावेळी संपर्कात येतात. यातून एख्याद्याला कोरोनाची लागण झाली तर त्यातून अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भितीही पटोले यांनी व्यक्त केली होती.

Previous articleबियाणे खते,उपकरणे,चिकन,मटण,अंडी,मासे यांची दुकाने सुरू करण्यास परवानगी
Next articleराज्यात १४ एप्रिल ते ३० एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन ?