प्रविण दरेकरांचा सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई । पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना आणि वसुंधरा दिवसाचा मोठा कार्यक्रम पर्यावरण विभागाकडून केला जात असताना त्याच्या पूर्वसंध्येला सुमारे ४० झाडांची कत्तल राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांच्या वरळी मतदारसंघात केली जाते.मुंबई महानगर पालिका आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खुलेआम कत्तल करण्याची हिंमत वृक्ष शत्रू दाखवू शकले,असा घणाघात आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यावर केला.

काल या वृक्ष कत्तलीची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर दरेकर यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आज तातडीने घटनास्थळाला सकाळीच भेट दिली, त्यांच्यासमवेत भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे देखील होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पर्यावरण मंत्री ज्या मतदार संघाचे आमदार आहेत त्याच मतदार संघात खुलेआम झाडांची कत्तल होणे निषेधार्ह आहे. झाडं तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकारी आणि माहिती स्वतः पोलीस उपायुक्तांनी दिली. असं असेल तर हे कायद्याच राज्य आहे का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

झाडांमुळे होर्डिंग दिसत नाहीत, झाडं होर्डिंगच्या आड येतात म्हणून या झाडांची कत्तल केली गेल्याचं अनेक राहिवाशांचं म्हणणं आहे, असं असेल ते फार गंभीर आहे. आता वातावरण संतप्त आहे म्हणून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण शांत होण्याची वाट न बघता, या पाठीमागे नेमके कोण आहेत याचा तपास करून संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. कारण, झाडांच्या कत्तलीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, व्हिडीओ क्लिप देखील आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. साधार पुरावे असल्यामुळे आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकतात. एव्हढेच नाही तर वृक्ष प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण, पावसाळ्यापूर्वी सोसायट्या ट्रीमिंग साठी परवानग्या मागतात त्यावेळी त्यांच्याकडे वेळ नसतो, झाड पडून, फांद्या पडून घरांचे नुकसान होते, जीवित हानी देखील होते. या घटनेत तर खुलेआम झाडांची कत्तल केली गेली आहे, याचा अर्थ महापालिकेच्या कायद्याची भीती राहिलेली नाही आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

आम्ही कोणतीही मागणी वैयक्तिक द्वेषातून करीत नाही, हा पर्यावरण मंत्र्यांचा मतदार संघ आहे आणि तिथेच अशा घटना घडत असतील, कुंपणचं शेत खायला लागले तर शेवटी लोकांनी कुणाकडुन अपेक्षा धरायची, हा प्रश्न आहे. एक झाड जगवायला ७ – ८ वर्षांचा काळ लागतो, एका बाजूला ऑक्सिजनची कमतरता आहे, अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी सरकार पैसे खर्च करते, सामान्य नागरिकही सहभाग देतात आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम कत्तल होत असेल तर सरकारने, पोलिसांनी आणि महानगरपालिकेने याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठीच आज तातडीने आम्ही येथे आलो आहोत, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

Previous articleनवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा
Next articleवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण