ओबीसींचे आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार : पंकजा मुंडेंनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

पुणे । ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे, हे आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही,ही तर सुरुवात आहे, आरक्षणाचा हा लढा भविष्यात अधिक तीव्र करू अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला ठणकावले.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज आणि पिंपरी चौकात भाजपच्या वतीने आज उत्स्फूर्त ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनास सुरवात करण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी शाहू चौकात जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलतांना राज्य सरकारवर घणाघात केला.आपले सरकार असतांना आपण ओबीसींच्या राजकीय आरक्षणात न्यायाची भूमिका घेतली होती. पण नंतर आलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण रद्द झाले. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे आहे त्यांनी ते करावं. सरकारने मन मोठं केलं पाहिजे.सरकारमधील मंत्र्यांना आंदोलनाची भाषा शोभत नाही, त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवावा असे त्या म्हणाल्या.
शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा, आरक्षणाचा पाया रचला. सामान्य माणसाला सत्तेत आणण्यासाठी लोकनेते मुंडे राजकारणात आले. वंचित, पिडिताचा वाली आणि वाणी बनण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, त्यांचे हेच स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे असे त्या म्हणाल्या.काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही. आतापर्यंत अनेक निवडणुका सरकारने जशा पुढे ढकलल्या तशा हया देखील ढकलाव्या. यह चक्का जाम झांकी है, असली आंदोलन बाकी है, असे सांगत भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न वेगवेगळा आहे, यात विनाकारण राजकारण आणून दोन समाजात भिंत उभा करण्याचे महापाप करू नका असे आवाहनही त्यांनी केले. ही लढाई सर्वानी मिळून जिंकायची आहे असेही त्या म्हणाल्या.पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चौकात चक्का जाम आंदोलन करणाऱ्या पंकजा मुंडे यांचेसह आ. महेश लांडगे, आ. माधुरी मिसाळ, तसेच महापौर व असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. “पंकजाताई आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, ‘अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे’, ‘ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान मे’, ‘परत द्या परत द्या आरक्षण परत द्या’ अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

Previous articleभाजपने ओबीसींचे नेते भुजबळांना तुरुंगात तर एकनाथ खडसेंना घरी घालवण्याचे काम केले
Next articleवादाऐवजी संवादावर भर देणारा,समाजाचा चोहबाजुनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता