महापालिका जिल्हा परिषदा,पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा “मास्टर प्लॅन”

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं करत नसल्याच्या तक्रारीचा पाढा आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाचल्याचे समोर आले आहे.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आमदारांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तर आगामी महानगरपालिका,नगरपालिक, जिल्हा परिषदा,पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी करण्यास सुरूवात केली आहे.राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सूचना यावेळी शरद पवार यांनी केली.त्यानुसार पालकमंत्री,संपर्कमंत्री,आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आणि प्रमुख पदाधिका-यांची महत्वपूर्ण बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली.सुमारे साडे पाच तास चाललेल्या या बैठकीत ५५ आजी माजी आमदारांनी आपली मते मांडली.विशेषतः जिल्ह्यातील परिस्थिती,मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे,त्याचा पाठपुरावा आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी वा युती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. याशिवाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीया बैठकीनंतर दिली.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं करत नसल्याच्या तक्रारी असंख्य आमदारांनी केल्याचे समजते.यावर बोलताना मलिक म्हणाले की,तीन पक्षाचे सरकार असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देतो.दोन पक्षाचे सरकार होते तेव्हाही अशा तक्रारी होत्या.एक पक्षाचे सरकार असले तरी नाराजी असतेच.आमदारांची सर्व काम होतीलच असे नाही.

आमदारांच्या या तक्रारीवर राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले असे मलिक यांनी सांगितले. राज्यातील महानगपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी महत्वाच्या असलेल्या या बैठकीला आजी माजी आमदारांसह राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा.सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सुचना यावेळी शरद पवार यांनी केली.त्यानुसार तात्काळ पालकमंत्री,संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.तसेच राज्यसरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणारे प्रश्न निश्चित सोडवले जातील मात्र इंधन दरवाढ, गॅसदरवाढ असे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत त्यावर कोविड नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्यावर निर्णय घेण्यात आल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाने ओबीसी रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मलिक यांनी सांगितले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरसकट युती आघाडी न करता स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मलिक म्हणाले.कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला जनता दरबार येत्या गणेशोत्सवानंतर कोरोनाचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Previous articleकोरोना काळात आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आशीर्वाद देईल
Next articleपरमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधात कटकारस्थान