राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद असून,यंदाचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.परंतु प्रत्यक्षात महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरू होतील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

आज माध्यमांशी बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली वर्षभर महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालये सुरू होती.सध्या राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच यंदाचे शैक्षणिक वर्ष येत्या १ नोव्हेंबरपासून सुरु होईल.मात्र प्रत्यक्षात महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू होतील अशी माहिती सामंत यांनी दिली.महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली.महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मक पाऊले टाकत आहोत.प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत म्हणाले.महाविद्यालये सुरू करण्यासदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून नियमावली तयार केली जाणार असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर महाविद्यालये सुरू करण्टयाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती सामंत यांनी दिली.

राज्यातील महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहायचे की नाही याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे.महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असेही सामंत स्पष्ट केले.राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळाली आहे.प्राध्यापक भरतीसंदर्भातील फाईल सोमवारी किंवा मंगळवारी अर्थ विभागाकडे जाणार आहे. राज्यात एकूण ३ हजार ७४ प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Previous articleपूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटीची परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला होणार
Next articleघोषणा खूप झाल्या,आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा