मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन-२०२२-२३ या वर्षाचा व महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला.त्यामध्ये घरगुती पाईप गॅसचा वापर करणारे,सीएनजीवर चालणारी वाहने,रिक्षा ,टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायूवरील ( सीएनजी ) कर ३.५ टक्के इतका केला आहे. यापूर्वी हा कर १३.५ टक्के होता. आज अर्थंसकल्प सादर करताना पवार सीएनजी वरील कर १० टक्क्यांनी कमी केल्याने याचा वापर करणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निर्णयामुळे सीएनजी वितरक कंपन्यांकडून दर कपात होण्याची शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली होती. मुंबई आणि पुणे सारख्या महानगरात सीएनजीचा दर ६३ ते ६६ रुपयांच्या दरम्यान आहे. घरगुती वापराचा पाईप गॅस आता ३६ ले ३८ रुपये किलो आहे.या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात सुमारे ८०० कोटीची घट होणार आहे.