मुंबई नगरी टीम
मुंबई । सध्या गाजत असलेल्या काश्मीर फाईल्स हा चित्रपटावरून राजकीय धुरळा उडायला सुरूवात झाली आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट मध्यांतरानंतर कंटाळवाना आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर माझे काही म्हणणे नाही,मात्र १७ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने १५० कोटींचा गल्ला जमा झाला आहे.हा पैसा कश्मिरी पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा,असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
आज विधानसभेतील अर्थसंकल्पीय चर्चेवेळी विरोधी पक्षातील आमदारांना कमी वेळ मिळाला असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.त्यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात चर्चा सुरू असताना भाजपचे आमदार ‘कश्मीर फाईल्स पाहण्यासाठी गेले होते असे सांगितले.पाटील हा मुद्दा लावून धरत असतानाच विरोधी पक्षनेते फडणवीस उटळे आणि म्हणाले,होय आम्ही कश्मीर फाईल्स चित्रपट बघायला गेलो होतो,डंके की चोट पे बघायला गेलो होतो,तेव्हा जयंत पाटील यांनी कश्मीर फाइल्स बघायला गेलात त्यावर काही म्हणणे नाही, असे सांगताना विरोधकांना जोरदार टोला लगावला.’काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर जयंत पाटील आपले म्हणणे मांडत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून पाटील यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते.या प्रकारामुळे जयंत पाटील प्रचंड संतापले.खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा आम्हालाही खाली बसून बोलता येते त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका असे खडे बोल पाटील यांनी विरोधकांना सुनावले.सभागृहात पहिल्यांदाच शांत असणारे जयंत पाटील पहिल्यांदाच संतापले.यावेळी ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजप सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.