राजीनामा देवूनही नसीम खान यांचा पत्ता कट;भाई जगताप,चंद्रकांत हंडोरेंना संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेस समितीच्या उदयपूर नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार,महाराष्ट्रात एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार प्रदेश कार्याध्यक्ष असलेले माजी मंत्री नसिम खान यांनी मुंबई काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देवूनही त्यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली नाही.भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.त्यामुळे भाई जगताप पक्षाच्या एक व्यक्ती, एक पद या धोरणाची अंमलबजावणी करणार का अशी चर्चा आहे.

 

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत असून,संख्याबळानुसार काँग्रेसच्या दोन जागा निवडून येवू शकतात.काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी दोन जागांसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.दोन जागांसाठी काँग्रेसकडून माजी मंत्री नसीम खान,मोहन जोशी,बसवराज पाटील इच्छूक होते.भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उद्या ( गुरूवारी ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.विधानसभेत काही मतांनी पराभव पत्करावा लागलेले नसीम खान हे विधानपरिषदेसाठी इच्छूक होते.दोन जागांसाठी मोहन जोशी आणि बसवराज पाटील हेही इच्छूक होते.शेवटी मुंबईतील भाई जगताप आणि मागासवर्गीय नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.काँग्रेस समितीच्या उदयपूर नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार, महाराष्ट्रात ‘एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसिम खान यांनी मुंबई काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदे धारण करणाऱ्या तसेच, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदांवर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना पद सोडावे लागणार आहे.विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेले नसीम खान यांनी राजीनामा दिला होता मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे समजते.

येत्या ऑक्टोबर मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याची चर्चा आहे.चंद्रकांत हंडोरे यांची ओळख मागासवर्गीय घटकातील काँग्रेसचा चेहरा अशी आहे.शिवाय त्यांनी मंत्रीपदासह मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे.कामगार नेते आणि काँग्रेसमधील आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले भाई जगताप यांच्या उमेदवारीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल यामुळेच या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Previous articleपंकजा मुंडेंना डावललं! प्रवीण दरेकर,राम शिंदे,प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय,उमा खापरेंना उमेदवारी
Next articleसुभाष देसाईंना उमेदवारी नाहीच;आदित्य ठाकरेंना निवडणूक सोपी जावी म्हणून सेनेत गेलेल्या सचिन अहिरांचे पुनर्वसन