ब्रिटीश सत्तेला पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या दडपशाहीला भीक घालणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे.गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे,काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही.दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते,खासदार,पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे.पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही.राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे.सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री,मंत्री,खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे.दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे पंरतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही असेही पटोले यावेळी म्हणाले.राहुल गांधी आपल्या जीवाची पर्वा न करता केंद्रातील सरकारविरोधात जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारत आहेत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार व भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार १६ जून रोजी राजभवनसमोर आंदोलन करणार आहे तर परवा १७ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून भाजपा सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करेल.

एका प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, राजभवनवर केल्या जाणाऱ्या आंदोलनातून लोकांची जनभावना राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळावी यासाठी केले जात आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते व पत्रकारांना मारहाण केली, कलम १४४ लावले आहे. कोणत्याही कार्यालयात कलम १४४ कसे काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे.विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे. राहुलजी गांधी यांनी अर्थव्यवस्था, कोरोना, बेरोजगारी, केंद्राच्या लोकविरोधी धोरणांव सातत्याने टीका करून प्रश्न विचारले, त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांना देता आले नाही त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि देशातील जनता राहुल गांधीजींच्या सोबत आहे. आम्ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि भाजपच्या हुकुमशाहीला नमवू.

Previous articleचुकीची माहिती गोळा केल्यास राजकीय आरक्षण नोकरी आणि शिक्षण आरक्षणावर परिणाम
Next articleशरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावीः शिवसेनेचा आग्रह