गद्दारांनी खोके स्वतःकडे ठेवले, शेतक-यांच्या मदतीसाठी दिले नाहीत ; आदित्य ठाकरेंचा प्रहार

मुंबई नगरी टीम

नाशिक । राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.विरोधी पक्षाकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात असतानाच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये नुकसानग्रस्त शेतक-यांची भेट घेवून धीर दिला.आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत मदतीला दिले नाहीत,अशी टीकाही त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली.

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचे झालेल्या नुकसान याबाबतची माहिती घेतली.त्यांनी पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका;उद्धव ठाकरे यांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे.याशिवाय त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला.गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले मदतीला दिले नाहीत.पण आम्हाला राजकारण करायचे नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठून असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला.दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, भेटायला पण मुख्यमंत्री आले नाहीत, असे गाऱ्हाणं या ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडले.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं झोपतात केव्हा,हा खरंतर संशोधनाचा विषय : उपमुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांची तारीफ
Next articleअरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू