मुंबई नगरी टीम
मुंबई : सरकारकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने अनेकांनी आपला मोर्चा मनसेकडे वळवला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील रेल्वे प्रवासाच्या मागणीसाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाल्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले.गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेने प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती.पंरतु रेल्वे प्रशासनाने त्यांची मागणी मान्य न केल्याने डबेवाल्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.
रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आपल्याला द्यावी, अशी मागणी यावेळी मुंबईच्या डबेवाल्यांकडून करण्यात आली आहे. डबेवाल्यांनी महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत परवानगी मागितली होती. मुंबईकरांप्रमाणेच डबेवाल्यांची लाईफलाईनही लोकल रेल्वेसेवा आहे. पंरतु प्रशासनाकडून ही मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
लोकल प्रवासाची आमची मागणी मनसेने उचलून धरली आणि आंदोलन केले. मनसेच्या या भूमिकेचे डबेवाल्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, मनसेने काही दिवसांपूर्वीच रेल्वेने प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. या आंदोलनाला देखील डबेवाल्यांनी पाठिंबा दिला आहे. तर मनसेने आंदोलन करून वात पेटवली आहे. त्याचा भडका केव्हाही होऊ शकतो,असा इशाराही डबेवाल्यांकडून देण्यात आला आहे.