यापूर्वी ‘मशाल’ चिन्ह कोणत्या पक्षाचे होते ? कोणत्या कारणामुळे शिंदे गटाला ‘गदा’ चिन्ह नाकारलं

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्षाला नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.तर शिंदे गटाला निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय देण्याचे आदेश देतानाच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना पक्ष नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.उद्धव ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह समता पार्टीचे होते तर गदा हे चिन्ह धार्मिक प्रतीक असल्याने शिंदे गटाला देण्यास नकार देण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असेलेले धनष्यबाण हे गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर शिवसेनेकडून त्रिशूळ,उगवता सूर्य आणि मशाल चिन्ह तर शिंदे गटाकडून त्रिशूळ,उगवता सूर्य आणि गदा हि चिन्हे मिळावीत अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर निर्णय देत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे पक्षाला नाव देण्याचा निर्णय दिला आहे.शिंदे गटाने निवडणूक चिन्हासाठी उद्यापर्यंत तीन पर्याय देण्याचे आदेश देतानाच त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असे पक्षाला नाव देण्याचा निवडणूक निर्णयही आयोगाने घेतला आहे.हा निर्णय अंधेरी पोटनिवडणूकीसाठी अंतरिम आदेश आहे.मात्र शिवसेनेला मिळालेले मशाल चिन्ह हे पूर्वी अध्यक्ष असलेल्या जया जेटली यांच्या समता पार्टीचे निवडणूक चिन्ह होते.२००४ मध्ये समता पार्टी या पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. शिवाय मशाल हे चिन्ह सध्या उपलब्ध असलेल्या यादीत नसल्याने उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.शिंदे गटाने गदा या चिन्हाची मागणी केली होती.मात्र गदा चिन्ह हे धार्मिक प्रतीक असल्याने ते देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे.शिंदे गटाकडून त्रिशूळ,गदा आणि उगवता सूर्य ही चिन्हे मिळावीत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्रिशूळ आणि गदा ही धार्मिक प्रतीके तर उगवता सूर्य हे तामिळनाडू राज्यातील द्रविड मुनेत्र कझागम या पक्षाचे चिन्ह असल्याने ते शिंदे गटाला देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला.उद्या सकाळी १० वाजेपर्यंत शिंदे गटाने चिन्हांचे तीन पर्याय सूचवावेत असेही आदेशात म्हटले आहे.शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादावर अंतिम निर्णय होत नाही तो पर्यंत हे चिन्ह वापरण्याची मुभा असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

Previous articleअंधेरी पोटनिवडणूक : राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी
Next articleहिंदुत्वापासून दूर गेल्याने उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची प्रतीके असलेली चिन्हे मागण्याचा अधिकार नाही