जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीत दर महिन्याला जनता दरबार: उदय सामंत

जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीत दर महिन्याला जनता दरबार: उदय सामंत

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावात ग्रंथालये तसेच विज्ञान प्रदर्शनास व क्रीडा स्पर्धांना निधी वाढवून देणे आदींसह विकासाचे अनेक निर्णय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले.जनतेची कामे मार्गी लागावी यासाठी आपण दर महिन्याला जनता दरबार सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या एका बैठकीत त्यांनी नियोजन मंडळाच्या कामांचा आढावा अधिकारी वर्गाकडून घेतला त्यावेळी जिल्ह्याच्या विकासावर आपण कशा प्रकारे लक्ष देणार आहोत याचा आराखडा त्यांनी मांडला. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, तसेच आमदार हुस्नबानू खलिपे आदींसह अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मंढे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कन्हूराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंझारे आदी उपस्थित होते.

नियोजन मंडळाच्या कामाचा आढावा घेताना काही विशिष्ट कालावधी असतो तोवर लोकांची कामे मार्गी लागावी यासाठी आपण दर महिन्याला जनता दरबार सुरु करणार आहोत. यावेळी निर्णय घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित असावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवरे धरणफुटीची दुर्घटना घडून सहा महिने उलटले तरी नियोजन निधीतून होवू शकणारी कामे आणि त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सादर केले नाहीत याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन येणाऱ्या काळात त्या ठिकाणी होणारे पुर्नवसनाचे काम गतीमान पध्दतीने झालेच पाहिजे, असे सांगितले.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने जाहीर केली आहे याचे काम तीन टप्प्यात होणार आहे. ज्यांची कर्ज व व्याज रक्कम दोन लाखांच्या आत आहे असे शेतकरी तसेच त्यापुढील रकमांची बाकी असणारे शेतकरी आणि ज्यांनी दरम्यानच्या काळात नियमित परतफेड केली आहे असे शेतकरी अशा तीन प्रकारच्या याद्या येत्या चार दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कर्जमाफी योजना जलदगतीने राबविण्यासाठी जिल्ह्यात ७७४ पैकी ६३७ ग्राहक सेवा केंद्र कार्यान्वित आहेत त्यांना बायोमेट्रिक मशीन कमी पडून दिल्या जाणार नाही. गरज असलेल्या २०० बायोमेट्रिक यंत्रांची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी सभागृहास दिली.मत्स्य व्यवसाय विभाग स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना दंठ ठोठावतात परंतु परप्रांतातील मासेमारांना सोडून दिली जाते किंवा कमी प्रमाणात दंड केला जातो असा भेदभाव चालणार नाही. परप्रातांतील सर्व मासेमारांना रोखा असेही निर्देश त्यांना दिले.बंदरांचा विकास आणि त्याची आजची परिस्थिती व सागर बंधारे याचीही माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. आरे वारेच्या समुद्र किनाऱ्याच्या विरुध्द बाजूस मोठ्या प्रमाणात वनविभागाची जमीन उपलब्ध आहे. याठिकाणी जयपूरच्या धर्तीवर प्राणीसंग्रहालयाचा प्रस्ताव तयार करा त्यासाठी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून अभ्यास करुन परिपूर्ण असा प्रस्ताव मिळाल्यास त्याला निधी उपलब्ध करुन देवू असे सामंत यांनी या बैठकीत सांगितले. गणपतीपुळे, आरे वारे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या स्वरुपाच्या प्राणीसंग्रहालयाची निर्मिती झाली तर रत्नागिरीच्या पर्यटनात वाढ नक्कीच होईल आणि स्थानिकांना याचा फायदा मिळेल असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या २२ ग्रामपंचायतींची जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बैठक घेवून या सर्व ठिकाणी ग्रंथालय सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या ग्रंथालयाच्या जागेची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी पुस्तक खरेदीसाठी निधी नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देवू असेही ते म्हणाले. कौशल्य विकास अंतर्गत उपलब्ध निधी संस्थांच्या अपग्रेडेशनसाठी वापरला गेला पाहिजे व त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी कौशल्य विकास अधिकारी आणि रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले. १०० बड्या कंपन्यांशी संपर्क साधून रत्नागिरीमध्ये भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यासाठी आपण पुढाकार घेवू असेही ते म्हणाले.

Previous articleराज्यात लवकरच तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना
Next articleसहा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान