नांदेड मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी ; भाजपचा धुव्वा

मुंबई नगरी टीम
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ जागा जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.

राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आलेला नसून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाला. काँग्रेसच्या या घवघवीत यशाने नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे.या पोटनिवडणुकीत नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार १ हजार ८६६ मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र. २ (अ) मध्ये काँग्रेसच्या कविता नारायण बोलमवाड २२९ मतांनी तर व़ार्ड क्र. ४ (अ) मधून काँग्रेसचेच सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड ४६६ मतांनी, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. १३ मधून काँग्रेसच्या अजगरी बेगम अ. रहेमान ३४१ मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. १ मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव २०७ मतांनी विजयी झाले असून, बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. ५ (अ) मध्ये काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना केवळ ७० मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

Previous articleकेंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा
Next articleआता तरी सरकार जागं होणार का ? : प्रविण दरेकर