कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी राज्यसभेत उपस्थित का नव्हतो…शरद पवारांनी सांगितले कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतरही कृषी विधेयक मंजूर करण्यात आले.या महत्वपूर्ण विधेयकावरील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सभागृहात हजर नव्हते.त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या.याबाबत त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. तसेच याबाबत अनेक कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे असल्याकारणाने त्यासाठी मला मुंबईमध्ये थांबावे लागले.त्यामुळे मला दिल्लीला जाता आले नाही,असे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

मराज्यसभेत झालेल्या गोंधळात कृषी विधेयके मंजूर करण्यात आले.त्यानंतर राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.यावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दिवसभर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सदस्यांनी आपले आंदोलन मागे न घेतल्याचा आनंद असून याला आपला पाठिंबा आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले तसेच कृषी विधेयके रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर झाले त्यावेळी शरद पवार यांची उपस्थिती नसल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी स्पष्टीकरण दिले.  मराठा आरक्षण प्रकरणी अपील करण्याची गरज असल्याने आपल्याला दिल्लीत जाता आले नाही,असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कृषी विधेयकांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी विधेयकासंदर्भात दोन ते तीन दिवस चर्चा करणे गरजेचे होते. पण ही विधेयके तातडीने मंजूर करावी,असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. तर विरोधी पक्षातील सदस्य चर्चा करण्याची मागणी करत होते. परंतु आवाजी मतदान घेऊन विधेयके पारित करण्यात आली. सदनाचे काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असावा,अशी टीका शरद पवार यांनी केली आहे

राज्यसभेत विरोधकांकडून घडलेल्या प्रकारावर देखील त्यांनी भाष्य केले.हे नियमाविरोधात असल्याचे काही जण सभापतींना सांगत होते सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली.नियमांचे पुस्तक अनेकदा दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात सदस्यांकडून ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमांचा आधार सदस्य घेत असतील तर सभापतींनी ते ऐकून घेणे अपेक्षित होते. तरी देखील आवाजी मतदान घेण्यात आले. त्यामुळे साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणे, अशी माझी अपेक्षा होती, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. तर आदर्श विचारांना तिलांजली देण्याचे काम उपसभापतींनी केले असल्याची टीकाही त्यांनी केली. या सर्व घटनेवर भावना व्यक्त करण्यासाठी सदस्यांनी आंदोलन केले आहे. सदस्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचेही  पवार म्हणाले.

आयकर विभागाने नोटीस पाठवून निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण मागवले असल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली.२००९,२०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे.मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे.नोटीस अगोदर मला देण्यात आली,आता आता सुप्रियाला येणार असल्याचे समजते असे सांगतानाच संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे असेही पवार म्हणाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे.त्याचे उत्तर लवकरच  देणार आहे. उत्तर दिले नाही तर दिवसाला १० हजारांचा दंड असल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये आहे,असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराप्रश्नी तात्काळ निर्णय घ्या : प्रविण दरेकरांची मागणी
Next articleखाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्या; खा.श्रीकांत शिंदेंची मागणी