मुंबईतील लोकल सेवा केव्हा सुरू होणार ; आदित्य ठाकरेंनी दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा,अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबईउपनगरातील लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय गर्दी टाळण्यासाठी राज्यातील कार्यालये दिवस-रात्र खुली ठेवण्याचा विचारही सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकार प्रयत्नशील असलेल्या उपाययोजनांवर भाष्य केले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक दिवसांपासून मुंबईकरांकडून लोकल सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. या सर्वांचा विचार करून खबरदारी घेत ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा देखील विचार आहे. त्यानुसार दिवस-रात्र कार्यालये सुरू ठेवता येतील का? याचा देखील विचार केला जात आहे. जेणेकरून रेल्वे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येणार नाही. यासंदर्भात वेगवेगळ्या उद्योजकांशी देखील चर्चा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईसारख्या शहरात वेगवेगळे उद्योगधंदे आहेत. त्यात सर्वांसाठी वेळेचा एकच नियम ठेवणे अवघड आहे. त्यामुळे विविध व्यावसायिकांशी कामाच्या वेळेसंदर्भात चर्चा सुरू आहे. सध्या दिवस-रात्र कार्यालये खुली ठेवण्याच्या योजनेवर चर्चा सुरू आहे. तर केवळ कोरोना काळासाठी नव्हे तर नंतर देखील या योजनेचा वापर करता येईल. त्यामुळे कामाच्या वेळेत लवचिकता येईल व वाहतुकीवरील ताण कमी होईल. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेची सेवा देण्यात आली आहे. तर इतरांसाठी बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अनेकदा बससाठी ताटकळत राहावे लागत असल्याने लांब पल्ल्याच्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वांना लोकल रेल्वे सेवेची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.

Previous articleनवरात्रीत गरबा,दांडिया खेळण्यास बंदी ;गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
Next articleजात प्रमाणपत्र पडताळणीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढा