भाजपचा गौप्यस्फोट : राष्ट्रवादी आणि भाजपचं ठरलं तर,पहाटेचा शपथविधी झाल्यावर कळेल !

मुंबई नगरी टीम

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान करून संभ्रम वाढविला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. होते. पाटील यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी छेडले असता,पाटील म्हणाले की, राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. नेत्यांनी एकमेकांना भेटले पाहिजे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या.शाह आणि पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.मात्र शहा पवार यांची नक्की भेट झाली का हे मला माहित नाही.पण अमित शहा यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी असेही पाटील यांनी सांगितले.महाविकास आघाडीचे नेते वारंवार सरकारला धोका नाही,असे सांगत आहेत.त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.पवार अहमदाबादला जाऊन शाह यांना का भेटले, याचा विचार झाला पाहिजे असे सांगतानाच, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही पाटील यांनी म्हणाले.

यावेळी त्यांनी संभाव्य लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक रुपयाचे ही पॅकेज महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले नाही.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विना शासकीय ताफा वस्त्यांमध्ये फिरावं लागेल.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल असेही पाटील यांनी सांगितले.कोरोना संसर्गजन्य आजार आहे,हे जगमान्यच आहे.त्यामुळे खबरदारी घेणे हाच त्यावर उपाय आहे. नागरिकांनी मास्क लावणे, सतत हात सॅनिटायझर आणि साबणाने धुतलेच पाहिजेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी करणे सारखे उपाय चालू शकतात.मात्र, पूर्णतः लॉकडाऊन करून काहीही साध्य होणार नाही असेही पाटील म्हणाले.

देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केले, तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांना सर्वातआधी दर महिना पाच हजारांचे पॅकेज जाहीर करा, जेणेकरून असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणारे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, रोजंदारी कामगार आदींना आधार मिळेल‌. पण राज्य सरकार एक ही रुपयाची मदत न करता, लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल. सर्वसामान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरु, असा पुनरुच्चार पाटील यांनी यावेळी केला.

Previous articleशरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; ब्रीच कँडीत बुधवारी शस्त्रक्रिया करणार
Next articleशरद पवार आणि अमित शहांची गुप्त भेट झालीच नाही,अफवांची धुळवड थांबवा!