भाजपचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी मंत्री जयंत पाटील सरसावले ; काय केले आवाहन ?

मुंबई नगरी टीम

जालना । जालना जिल्ह्यातील राखीव असणा-या आणि सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघात २०२४ ला राष्ट्रवादीचंच घड्याळ आणायचं याची खूणगाठ बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बदनापूर येथे केले.

बदनापूर येथे परिवार संवाद यात्रेला संबोधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.नवचैतन्य आणायचे असेल तर बुथ कमिट्यांचे मेळावे घ्या. पैसा हाच अंतिम विजय राजकारणात असतो असे नाही असेही पाटील म्हणाले.पक्ष संघटना मजबूत केल्याशिवाय विधानसभेत यश नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करा. आणि गांभीर्याने सगळ्या गोष्टी घ्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. पक्षाबद्दल आपुलकी असेल तर काही विषयांचे आकलन करण्याची गरज आहे असेही मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले.राष्ट्रवादीने सुरू केलेल्या अभिप्राय अभियानातील आलेल्या पत्रांचे वाचन यावेळी जयंत पाटील यांनी केले. पालकमंत्री म्हणून तुमच्या कामांची जंत्री तयार करुन त्या कामांचा निपटारा काढायला सोपं पडेल त्यामुळे तालुक्यातील कार्यालयात अशी कामे एकत्र करून मला पाठवा त्याची सोडवणूक केली जाईल. सिस्टमने काम करुया. येणाऱ्या काळात बदनापूर जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सदस्य निवडून आले पाहिजे. जिद्दीने व एकीने काम करा. तरच स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येतील व विकास कामांना गती मिळेल असे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

१९९०,१९९५ आणि १९९९ मध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेचे नारायण चव्हाण सलग निवडून आले होते.२००४ मध्ये शिवसेनेने नारायण चव्हाण यांना डावलून भानुदास घुगे यांना उमेदवारी दिली.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.२००९ साली हा मतदार संघ राखीव झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष सांबरे हे निवडून आले.२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली.त्यामध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभव करून निवडणुकीच्या केवळ महिनाभर अगोदर प्रचाराला लागलेले भाजपचे नारायण कुचे निवडून आले.सध्या भाजपचे नारायण कुचे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघावर राष्ट्रवादीने कब्जा करण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.

Previous article२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार
Next articleआरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची सीबीआय चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलन