सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा बिन आकड्यांचा अर्थसंकल्प

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपा सरकारच्या कार्यकाळातील योजनांचा विस्तार करून केवळ श्रेय लाटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. हा अर्थसंकल्प केवळ धनदांडगे,बिल्डर यांच्यासाठी आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा विचार नाही, महिला, आदिवासी, धनगर, ओबीसी, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील यंत्रणांना निधी पुरविण्याच्या तरतुदीबाबत विचार नाही. बेरोजगार व कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल, अशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. फक्त आभासी विकास दाखविणा-या राज्य सरकारप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प हा निव्वळ आभासी असून सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा बिन आकड्यांचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यावर दरेकर यांनी वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे. सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्याही भरीव योजना, कर्ज इतर गोष्टींसाठी कुठलीही तरतूद नाही. महिलांच्या उत्कर्षासाठी कुठल्याही प्रकारचे पॅकेज अथवा तरतुदी नाही. केवळ उद्योगांसाठी योजना केल्या आहेत. अर्थ मंत्री यांनी सभागृहात आकड्यांचा खेळ करणार नाही असे सांगितले. परंतु, अर्थसंकल्प हा आकड्यांचाच खेळ असतो. भावनिक अर्थसंकल्प नसतो. म्हणून, भावनिक वातावरण करून महाराष्ट्राच्या जनतेला फसवता येणार नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.

अर्थसंकल्पात बेरोजगारांच्या रोजगारासाठी कुठेही सोय नाही. अल्पसंख्यांक विभाग, कौशल्य विकास विभाग, मौलाना आजाद योजनांसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्रीभूत करून निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, धनगर ओबीसी समाजासाठी कुठलीही तरतूद नाही. आदिवासी समाजासाठी कोणत्याही योजना नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य घटकांना उपेक्षित ठेवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. सर्वसामान्यांचा विचार केला गेला नसल्याची टीका दरेकर यांनी केली.एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत. यांचा विचार या सरकारने केला नाही. एसटी कर्मचा-यांच्या बाबतीत कोर्टामध्ये बजेटमध्ये तरतूद करून त्यांच्या पगाराची हमी घेऊ असे सांगण्यात आले. परंतु, या अर्थसंकल्पात कवडीचीही तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून विधिमंडळात या अर्थसंकल्पाची चिरफाड करणार आहे. या अर्थसंकल्पाद्वारे कशी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसले आहे ते आकडेवारीसहित स्पष्ट करणार. यांचा पंच सूत्र आहे की कळ सूत्र आहे विधिमंडळात मांडणार असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Previous articleविकासाच्या बाबतीत कळसूत्री असलेल्या सरकारची पंचसूत्री काय कामाची ?
Next articleयेत्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसला आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच