मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आधीही प्रयत्नशील होतो आणि आताही आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.तसेच. मराठा आरक्षणाला कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावून नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात आंदोलने सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली.यावेळी अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत, असे अशोक चव्हाण बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली. तसेच घटनापीठ लवकर स्थापन व्हावे याकरता मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करत आहोत, असे अशोक चव्हाण म्हणाले.दरम्यान, अशोक चव्हाण यांना यावेळी मनसेने केलेल्या सविनय भंग आंदोलनाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले,प्रत्येक जिल्ह्याची वेगेवगेळी परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. जी माहिती राज्य शासनाकडे येते त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. तर कधी रद्दही करावे लागतात.मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील माहिती आहे. त्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे,असे अशोक चव्हाण म्हणाले.
केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे. मध्यस्थांना त्याचा फायदा होत आहे. अशा प्रकारचा कायदा देशात लागू होऊ नये, ही काँग्रेसची भूमिका आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रात सुद्धा आम्ही एकत्र असावे, अशी सर्वांची भावना आहे. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे. तिथे सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.